तुरीच्या खोडक्यावर जाळून घेत शेतकऱ्याची आत्महत्या

Friday, February 1, 2019
हिंगोली :- तालुक्यातील हिवराबेल येथील एका 68 वर्षीय शेतकऱ्याने 31 जानेवारी रोजी सकाळी 4 च्या सुमारास गावापासून जवळच पांदण रस्त्याच्या शेजारी असलेल्या तुरीच्या खोडक्यावर स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


नापिकीतून ही आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी बोलून दाखविले आहे. दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व पतसंस्थेचे असलेले कर्ज यामुळे शिवचरण गिरी हे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अस्वस्थ होते. यातच ते गुरूवारी सकाळी 4 वाजता घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांच्याच शेतशिवारात असलेल्या गणेश खंडू साबळे यांच्या शेतातील तुरीच्या खोडक्यावर जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

सकाळ होवूनही वडील घरात दिसत नसल्याने मुलांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली असता त्यांचा मुलगा कुंडलीक गिरी हे त्यांना पाहण्यासाठी शेताकडे गेला असता वाटेतच ही दुर्दैवी घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती घरी येवून दिली. त्यानंतर घटनेची माहिती पोलीस पाटील रंगनाथ शंकर मुंढे यांनी बासंबा ठाण्यात दिल्यानंतर पोलीस कर्मचारी पोटे, रायवाडे, राठोड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. 

शिवाय घटनास्थळीच मयत शेतकऱ्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, ही घटना शेतकरी आत्महत्याच असावी अशी माहिती काही ग्रामस्थ देत होते. मयत शेतकऱ्याच्या नावे साडेतीन एकर शेतजमीन आहे. 

शिवाय काही बॅंक व पतसंस्थेचे त्यांच्या नावे कर्जही असल्याची माहिती आहे. तर सततच्या नापिकीपणामुळे गिरी यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. याप्रकरणी मयताचे नातेवाईक 1 फेबु्रवारी रोजी बासंबा पोलीस ठाण्यात फि र्याद देणार आहेत. रात्री उशिरापर्यंत सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

No comments:

Post a Comment