जिल्हा सामान्य रूग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड; तर आंदोलन उभारू-प्रहार जनशक्ती पक्ष

Tuesday, January 29, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात गोरगरीब रूग्णांना नेहमीच गैरसोयीचा सामना करावा लागतो. अनेकवेळा रूग्णालयात रूग्णांना पिण्यासाठी पाणी नसते. तर औषधींचा तुटवडा असल्याने पैसे मोजून बाहेरून औषधांची खरेदी करावी लागते, हे सर्व सुरू असताना शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना रूग्णालय प्रशासनाच्या वतीने खाटेएवजी जमिनीवर झोपवले जात असून शौचालयाच्या असुविधेमुळे महिलांना बाहेर जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ दिवसात रूग्णांना सुविधा उपलब्ध न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी गोर-गरीब, गरजू रूग्णांची नेहमीच गर्दी असते. यामध्ये महिलांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी अनेक महिलांचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, प्रसूती केली जाते. अपुऱ्या खाटेमुळे एकाच गादीवर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना रहावे लागते. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या महिला प्रसाधन गृहाला कुलूप लावण्यात आले असल्याने शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना शौचालयासाठी बाहेर जावे लागते. रूग्णांना अनेक गैरसोयींचा सामना याठिकाणी करावा लागत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष रवि बांगर व विलास आघाव यांनी पिडीत रूग्णांची भेट घेवून याबाबत प्रशासनाला जाब विचारला व आठ दिवसात रूग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदेालन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment