हिंगोली / प्रतिनिधी
पत्नी माहेरी आल्यानंतर तिला घेण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाने किरकोळ बोलण्याचा वाद मनात धरून 8 जानेवारी रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मेहुण्याची डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सेनगावात घडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या रमाबाई भारतआप्पा महाजन यांच्या सारिका नावाच्या मुलीचा विवाह राजाराम उर्फ राजू लक्ष्मण आवटे रा.हयातनगर ता.वसमत यांच्याशी झाला होता. मुलीला घरगुती कारणावरून मानसिक व शारिरिक छळ सासरची मंडळी देत असल्याने सारिका दहा दिवसांपुर्वी सेनगाव येथे आपल्या माहेरी आली होती. त्यानंतर सारिकाला घरी घेवून जाण्यासाठी तिचा पती राजाराम आवटे 8 जानेवारी रोजी सासरवाडीत आला होता. तेव्हा मुलीचे आई-वडील व भाऊ यांनी मुलीला त्रास देवू नका, तरच तुमच्याकडे नांदायला पाठवितो, असे सांगितले. याचाच राग मनात धरून 9 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता आरोपी राजाराम आवटे यांनी बायकोचा भाऊ अर्थात मेहूणा मन्मथ महाजन वय 23 वर्ष यांच्या डोक्यात घरातील दगडी खलबत्त्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, ही बाब मन्मथ यांच्या आईला समजल्यानंतर रोखण्याचा प्रयत्न केला असता रमाबाई यांना सुद्धा जीवे मारण्याच्या उद्देशाने जळतणातील लाकडाने डोक्यात मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत मन्मथ यांना हिंगोली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रक्तस्त्राव जास्त झाल्याने सकाळी 4 वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताची आई रमाबाई भारतआप्पा महाजन वय 50 वर्ष यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सेनगाव पोलीसांनी 10 तासाच्या आत वसमत येथून अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला अटक करण्यात पोलीस निरीक्षक सरदारसिंंह ठाकूर, पोलीस कर्मचारी अनिल भारती, मंचक ढाकरे, गोविंद शिंदे, महादू शिंदे यांचा समावेश होता.
No comments:
Post a Comment