विराट सेनेच प्रजासत्ताक दिनी आकर्षक भेट ; भारताचा दणदणीत विजय

Saturday, January 26, 2019


माऊंट मॉन्गॅनुईमधील बे ओव्हल इथे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ची आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने उत्कृष्ट फलंदाजी करत यजमानांना जेरीस आणले. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १५०हून अधिक धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने ९६ चेंडुंमध्ये ८७ धावा केल्या तर शिखर धवनने ६७ चेंडुंमध्ये ६६ धावा केल्या. या दोघांशिवाय विराट कोहली, अंबाती रायुडू महेंद्रसिंह धोनी यांनीही सुरेख फलंदाजी करत भारताची धावसंख्या ३२४वर पोहोचवली. 

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किवींना मात्र ५० षटकंही पूर्ण करता आली नाहीत. ४० षटकांमध्येच किवींचा सगळा संघ तंबूत परतला. कुलदीप यादवने या सामन्यात ४५ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या आणि भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. कुलदीप यादव-मोहम्मद शमीने १-१ विकेट घेतली तर यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी बाद केले. सरतेशेवटी २३४ धावांत न्यूझीलंडचा संघ गारद झाला.

न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला तीन आकडी धावसंख्या गाठता आली नाही आणि अर्धशतकही करता आलं नाही. न्यूझीलंडकडून डाऊग ब्रासवेल याने सर्वाधिक ५७ धावा केल्या. टीम इंडियाने न्यूझीलंडविरोधात सलग दुसरा विजय मिळवून या विजयासह २-०ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अवघा एक सामना जिंकून भारताला मालिकाही खिशात घालण्याची संधी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment