बाभळगावात दोन भावात हाणामारी सहा जणांना अटक

Wednesday, December 19, 2018
लातूर :बाभळगाव येथे प्लॉट खरेदीच्या वादातून दोन सख्ख्या भावात हाणामारी झाली .यात यात एक जण गंभीर जखमी असून या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर सहा जणांना अटक झाली. न्यायालयाने सर्वांचीच जामिनावर मुक्तता केली. बाभळगाव येथील हरिश्चंद्र मस्के व अंगद मस्के हे दोघे सख्खे भाऊ .यातील धाकटा अंगद बाभळगाव येथेच राहतो. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

थोरले भाऊ हरिश्चंद्र लातूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. अंगद याने हरिश्चंद्र यांना किरायाच्या घरात राहण्यापेक्षा बाभळगाव येथे जागा घेऊन येथेच व्यवसाय करण्याचा सल्ला दिला .त्यावरून अंगद यांच्या मध्यस्थीने हरिश्चंद्र यांनी अडीच लाख रुपये देऊन गावात प्लॉट घेतला. काही दिवसांनी हरिश्चंद्र यांच्या शेजारी असणारा प्लॉट दोन लाखात विक्री झाला.त्यामुळे भावाने आपल्याला फसवले, आपले जास्त पैसे गेले अशी भावना झाल्याने हरिश्चंद्र व अंगद यांच्यात वाद झाले.

परंतु काही दिवसांनी शेजारचा आणखी एक प्लॉट साडेतीन लाख रुपयात विकला गेल्याने दोघेही भाऊ हा वाद विसरले. दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास दोन्ही घरातील महिलांचे याच विषयावरून भांडण सुरु झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की त्यात पुरुष मंडळी सहभागी झाली .रागाच्या भरात अंगद मस्के यांनी थोरला भाऊ हरिश्चंद्र यांना सळईने मारहाण केली .त्यात ते गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी हरिश्चंद्र मस्के यांच्या फिर्यादीवरून अंगद मस्के याच्या विरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.अंगद यांनीही हरिश्चंद्र मस्के यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर विशाल मस्के यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे .याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील प्रत्येकी तीन सदस्यांना अटक झाली होती. न्यायालयाने जामिनावर त्यांची मुक्तता केली .मोलमजुरी करून जगणाऱ्या या दोन कुटुंबातील वाद आणि हाणामारी सध्या बाभळगावात चर्चेचा विषय ठरली आहे.

No comments:

Post a Comment