भाच्याने मामाच्या डोक्यात घातले दांडके; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, December 18, 2018
जालना : मुलगी शिकत आहे. आताच तिचे लग्न करायचे नाही. तुला तिला द्यायचे नाही, असे म्हणताच भाच्याने रागा-रागाने घरातून कुऱ्हाडीचा दांडा आणून मामाला जबर मारहाण केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बामखेडा येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. 


गणेश वामन सोनसाळे (टेंभुर्णी, ता. जाफराबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाचा नामदेव काळे याच्यासह भागवत काळे, कारभारी बकाल (बामखेडा ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी येथील गणेश वामन सोनसाळे यांची सासरवाडी बामखेेडा हे गाव आहे. 


याच गावात त्यांची बहीणही दिली आहे. दरम्यान, शनिवारी ते सासुरवाडीला आले होते. दरम्यान, भाऊ आला म्हणून त्यांची बहीण कलाबाई त्र्यंबक काळे यांनी गणेश यांना घरी चहा घेण्यासाठी बोलावले. याप्रसंगी भाचा नामदेव काळे मामाशी चर्चा करू लागला. 

नामदेव याने मामाकडे मुलीसाठी मागणी घातली. यावर मामांनी, तिचे आताच लग्न करायचे नाही, ती शिकत आहे, तुझ्याशी तिचे लग्न लावून देणार नाही, असे म्हणताच राग आल्याने नामदेव याने घरातून कुऱ्हाडीचा दांडा आणून मामाच्या डोक्यात मारला. यानंतर भागवत काळे, कारभारी बकाल यांनीही मारहाण करण्यास मदत करून जिवे मारण्याची धमकी दिली. 

या घटनेप्रसंगी मोठी गर्दी झाली होती. यात गणेश यांच्या डोक्यावर जबर मार लागला असून त्यांच्या डोक्याला सात टाके पडले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी गणेश सोनसाळे यांच्या तक्रारीवरून रविवारी नामदेव काळे, कारभारी काळे, भागवत काशीनाथ बकाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment