विशेष प्रतिनिधी
नांदेड-आगामी नांदेड लोकसभा निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षाने विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या ऐवजी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमिता चव्हाण यांना अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने उमेदवारी द्यावी असा नांदेड जिल्हा काँग्रेसचा एकमुखी ठराव काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांना मांडला असता उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी हात उंचावून राजूरकर यांच्या ठरावाला एकमुखाने मंजूरी दिली.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीेचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी माजी आ. संपतकुमार यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत अमिता चव्हाण यांच्या नावाचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट असतानाही नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण हे तब्बल 80 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. सध्या मोदी लाट ओसरली असून आगामी नांदेड लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. राहूल गांधी यांनी अशोकराव चव्हाण यांच्या ऐवजी सौ. अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अशी संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मागणी करण्यात येत असल्याचे आ. अमरनाथ राजूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगून महाराष्ट्राचे सहप्रभारी माजी आमदार संपतकुमार यांनी काँग्रेसाध्यक्ष खा.राहूल गांधी यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातील समस्त काँग्रेस पदाधिकार्यांच्या भावना कळवून अमिता चव्हाण यांनाच नांदेड लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी केली. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकार्यांनी हात उंचावून राजूरकर यांच्या मागणीला संमती दर्शवली आहे.
आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अशोकराव चव्हाण यांना विराजमान करण्यासाठी त्यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी व नांदेड लोकसभेसाठी अमिता चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास प्रचंड मतांनी सौ.चव्हाण यांच्या विजयाची खात्री समस्त काँग्रेस पदाधिकार्यांच्या वतीने देण्यात येत असल्याची ग्वाही राजूरकर यांनी महाराष्ट्राचे सहप्रभारी संपतकुमार यांना यावेळी दिली.
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेचे काम युध्द पातळीवर ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोंहचविण्यात आले आहे. पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले असून बुथ पदाधिकार्यांची नेमणूकही शंभर टक्के पूर्ण झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या शक्ती अॅपचे जाळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात विणल्या गेले आहे. जिल्ह्यात जवळपास 35 हजार काँग्रेस पदाधिकारी काँग्रेसच्या शक्ती अॅपव्दारे जोडले गेले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसला सर्वाधिक जागेवर विजय संपादन करता येईल असा दावाही राजूरकर यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राचे काँग्रेस सहप्रभारी माजी आमदार संपतकुमार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही अभेद राहिल याची पक्षश्रेष्ठींना खात्री आहे. आगामी लोकसभेची उमेदवारी सौ. अमिता चव्हाण यांना देण्याची एकमुखी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील समस्त काँग्रेस पदाधिकार्यांच्या भावना पक्षाध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्यापर्यंत पोंहचविण्याचे काम आपण करणार असून उमेदवारी देण्याचा अंतिम निर्णय मात्र राहूल गांधी हेच घेतील असे सुतोवाच त्यांनी केले.
या बैठकीचे नियोजन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले होते. या बैठकीस माजी राज्यमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.वसंतराव चव्हाण, महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर सौ.शिलाताई भवरे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, नामदेवराव केशवे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकार्यासह शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, मनपा, नगर पालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर पंचायतचे सर्व सदस्य, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, बुथ कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment