अल्पसंख्याकांना कसे वागवायचे ते मोदी सरकारला दाखवू : इम्रान खान

Sunday, December 23, 2018


लाहोर: अल्पसंख्याकांना कसे वागवायचे ते मोदी सरकारला दाखवून देऊ, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. संबंधित वक्तव्य करताना त्यांनी बॉलीवूड अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी जमावाच्या हिंसाचारासंबंधी मांडलेल्या भूमिकेचा आधार घेतला.


समान नागरिक म्हणून अल्पसंख्याकांना वागवले जात नसल्याचे भारतात काही लोक म्हणत आहेत. मात्र, पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांना त्यांचे योग्य हक्क मिळावेत याची निश्‍चिती करण्यासाठी आमचे सरकार पाऊले उचलत आहे. नव्या पाकिस्तानात अल्पसंख्याकांना समान हक्क मिळतील याची निश्‍चिती आम्ही करू. त्यांना सुरक्षित वाटेल अशी व्यवस्था आम्ही करू. दुबळ्यांना न्याय न मिळण्याचे रूपांतर केवळ बंडात होते, असे म्हणत इम्रान यांनी बांगलादेशचे उदाहरण दिले. पूर्व पाकिस्तानमधील जनतेला त्यांचे हक्क दिले गेले नाहीत. बांगलादेश निर्मितीमागचे ते एक प्रमुख कारण आहे, असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात गायांचे सांगाडे आढळल्यानंतर हिंसाचाराची घटना घडली. त्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यासह दोघे मृत्युमुखी पडले. त्या घटनेसंदर्भात नसीरूद्दीन यांनी दिलेली प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली. भारतात पोलिसापेक्षाही गायीला अधिक महत्व दिले जात आहे. देशात विष पसरले आहे. मला माझ्या मुलांची चिंता वाटते, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते.

No comments:

Post a Comment