उत्तरप्रदेश मधील तीन मंत्र्यांचे भ्रष्ट सचिव निलंबीत

Saturday, December 29, 2018


लखनौ: उत्तरप्रदेशातील तीन मंत्र्यांच्या सचिवांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबीत करण्यात आले आहे. हे तीन सचिव स्टींग ऑपरेशन मध्ये रंगेहाथ पकडले गेले होते त्यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी यांनी संबंधीतांवर ही कारवाई केली.
एका दूरचित्रवाणी वाहिनीने हे स्टींग ऑपरेशन केले. त्यात राज्यातील तीन मंत्र्यांचे सचिव बदल्या आणि सरकारी कंत्राटांसाठी लाच मागत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. मागासवर्ग विकास मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे खासगी सचिव एका बदलीसाठी 40 लाख रूपयांची मागणी करीत असल्याचे या स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसत आहे.

खाण खात्याच्या राज्यमंत्री अर्चना पांडे यांचे खासगी सचिव या वाहिनीच्या गुप्त वार्ताहराशी पैसे घेऊन खाण परवाने देण्यास तयार असल्याचे दिसून आले असून प्राथमिक शिक्षण मंत्री संदीपसिंग यांचे खासगी सचिव संतोष अवस्थी हे सरकारी पुस्तक खरेदी कंत्राटासाठी पैसे मागत असल्याचेही यात दिसून आले आहे. या तिन्ही मंत्र्यांच्या सचिवांना निलंबीत करण्यात आले आहे. सरकारी कामात बिलकुल भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असे नमूद करीत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या दहा दिवसात त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment