नागपूर : पावसाची तूट व अपुऱ्या सिंचन सोयीमुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनावर विपरित परिणाम होत होता. मात्र राज्यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून कामे करण्यात आली. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी 72 टक्के पाऊस होऊनसुद्धा विकेंद्रित पाणीसाठ्यामुळे अनेक ठिकाणी कृषी उत्पादनात वाढ झाली आहे. ॲग्रोव्हिजन प्रदर्शनामुळे नव्या तंत्रज्ञानाचा परिचय शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात ॲग्रोव्हिजन मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रेशीमबाग मैदानावर आयोजित दहाव्या ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. तर केंद्रीय भूपृष्ठ व परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंग, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सार्वजनिक बांधकाम व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषी मंत्री प्रेमकुमार, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, खासदार डॉ.विकास महात्मे, कृपाल तुमाने, रामदास तडस, अशोक नेते व कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ॲग्रोव्हिजन प्रदर्शनामुळे देशातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कार्य केले असून शेतकऱ्यांना 21 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. कृषी संबंधित 27 हजार कोटींचे अनुदान दिले. या चार वर्षात 48 हजार कोटींची मदत विविध मार्गाने शासनाने शेतकऱ्यांना केले आहे.
दीड लाख शेततळे व दीड लाख सिंचन विहिरी निर्माण करुन कृषी सिंचनाची शाश्वत व्यवस्था शासनाने उभी केली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 16 हजार गावात 5 लाख कामे केली आहेत. यावर्षी 72 टक्के पाऊस होऊनसुद्धा जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये अनेक जिल्ह्यात कृषी उत्पादन वाढले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून अनेक वर्षापासून उपलब्ध असलेले 5 लाख कृषिपंप शासनाने वाटप केले आहे. 2 लाख सोलर कृषिपंपाची योजना तयार असून शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कृषी उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात असून ड्रोनच्या माध्यमातून कीड नियंत्रण करण्यासाठी फवारणी करण्यात येणार आहे. ॲग्रोव्हिजन प्रदर्शन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment