चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीवर चाकूहल्ला.

Friday, November 30, 2018

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला केल्याची घटना भिवंडीतील कोनगावमध्ये घडली आहे. पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोनगाव परिसरात राहणारी ३५ वर्षीय पीडित महिला घरकाम करत असून तिला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुली आणि एक मुलगा आहे.

पती काहीच काम करत नसल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत असल्याने महिला पतीपासून वेगळी राहत आहे. दरम्यान तुफील नुरमहमद शेख (३८) याच्याशी तिचे सूत जुळले. मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असून पहिल्या पतीला सोडून देत ही महिला तुफील याच्यासोबत राहू लागली. 

सोबत तिच्या दोन मुली होत्या. मात्र तुफील हा तिच्यावर संशय घेऊ लागला. तसेच सतत मारहाण करून मुलाला भेटण्यासही मज्जाव करत होता. आरोपीने महिलेला गळा आवळून मारण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली नव्हती. 

बुधवारी दुपारी रिक्षावरून घरी आलेल्या तुफील याने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि चाकू पोटावर मारल्याने ही महिला गंभीर जखमी झाली. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी अटकही केली.

No comments:

Post a Comment