Rafale Deal: 'आम्ही खोटं बोलत नाही;दसॉल्ट'च्या सीईओचं राहुल गांधींना उत्तर

Tuesday, November 13, 2018

नवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फ्रान्सची विमान बनवणारी कंपनी दसॉल्ट एव्हिएशनवरही गंभीर आरोप केले होते. राफेल विमान खरेदीप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक ट्रॅपिअर यांनी काँग्रेसचे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.

राफेल डीलबद्दल मी खोटं बोलणार नाही, असं दसॉल्टच्या सीईओंनी म्हटलं. 'मी याआधीही याबद्दल बोललो आहे. मी तेव्हाही खरं बोललो आणि आताही खरंच बोलतोय. मी खोटं बोललो, असं याआधी कधीही झालेलं नाही. तुम्ही सीईओ पदावर काम करताना खोटं बोलू शकत नाही,' असं ट्रॅपियर राहुल गांधींच्या आरोपांवर बोलताना म्हणाले. 

संरक्षण क्षेत्र आणि विमान निर्मितीमधला कोणताही अनुभव नसतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं दसॉल्टनं रिलायन्सला राफेलचं कंत्राट दिल्याचा आरोप राहुल यांनी वारंवार केला आहे. त्यावर एरिक यांनी डॅसोची भूमिका स्पष्ट केली. आम्ही स्वत:हून या करारासाठी रिलायन्सची निवड केली, असं त्यांनी सांगितलं.

'राफेलच्या निर्मितीसाठी दसॉल्टनं स्वत:हून अनिल अंबानींच्या कंपनीची निवड केली होती. केवळ अंबानींशीच नव्हे तर अन्य ३० कंपन्यांशी आमचा करार झाला आहे,' 'अनिल अंबानींच्या कंपनीशी झालेल्या कराराबाबत आम्ही याआधीही निवेदन दिलंय. त्यात काहीही खोटं नाही. काँग्रेस पक्षानं आमच्या कंपनीविरुद्ध केलेले आरोप दुर्दैवी आहेत. काँग्रेस पक्षाशी आमचे खूप जुने संबंध आहेत. नेहरू पंतप्रधान असताना १९५३ मध्ये आम्ही भारत सरकारशी पहिला करार केला होता. अन्य पंतप्रधानांसोबतही आम्ही काम केलंय. आम्ही भारतासोबत काम करतो. कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही,' असं ट्रॅपियर म्हणाले. 

मोदी सरकारनं फ्रान्सशी नव्यानं केलेल्या राफेल करारावरून देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यात घोटाळा असल्याचा आणि 'दसॉल्ट' खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. राफेल कराराचे सत्य जनतेला सांगावे अशी मागणीही काँग्रेसनं केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात राफेलच्या कराराची संपूर्ण माहिती सादर केली. त्यानंतर आज 'एएनआय'शी बोलताना 'दसॉल्ट'च्या सीईओंनी पुन्हा एकदा या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. 

रिलायन्सला फायटर जेटच्या निर्मितीचा अनुभव नसतानाही त्यांना भागीदार करून घेतल्याच्या आक्षेपालही ट्रॅपियर यांनी उत्तर दिले. 'रिलायन्स हा दसॉल्टशी झालेल्या जॉइंट व्हेंचरचा केवळ एक भाग आहे. राफेल निर्मितीसाठी मिळणारा एकही पैसा थेट रिलायन्सला दिला जाणार नाही. तो पैसा 'जॉइंट व्हेंचर'ला जाणार आहे. आमच्याकडं इंजिनीअर आणि कुशल कर्मचारी आहेत. करारातील तांत्रिक व औद्योगिक टप्पा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असणार आहे. रिलायन्सनं एका वेगळ्या उद्देशानं यात पैसा टाकला आहे. दसॉल्टशी सहकार्यामुळं रिलायन्सला एअरक्राफ्ट निर्मितीचं तंत्र शिकता येणार नाही. त्यात भारताचा फायदा आहे,' असंही ट्रॅपियर यांनी स्पष्ट केलं.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment