परभणी, (प्रतिनिधी) ः- येथील युनियन बँक ऑफ इंडियाने ग्राहकाचे 10 रूपयांचे नाणे स्विकारण्यास नकार दिल्यामुळे ग्राहकाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच परभणीकडे रीतसर तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत जिल्हा ग्राहक न्याय मंचने युनियन बँक परभणी शाखेला 1500 रूपयांचा दंड लावून दणका दिला आहे.
परभणी येथील विवेक विजयकुमार मुंदडा यांचे युनियन बँक ऑफ इंडिया परभणी शाखेत मागील 8-9 वर्षांपासून बचत खाते आहे. ते आपल्या खात्यात 10 रूपयांचे नाणे भरण्यास गेले असता बँकेने प्रथमतः ते स्विकारण्यास नकार दिला. नंतर केवळ 1000 रूपये रक्कमेचे नाणे घेतल्या जातील असे सांगून 1000 रूपये रक्कमेचे नाणे स्विकारले व इतर नाणे परत केले. तसेच शाखा व्यवस्थापक यांनी आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून नाणे न स्विकारण्याचे आदेश असल्याचे तोंडी सांगितले. त्यानंतर अर्जदार विवेक मुंदडा हे परत 25/01/2018 रोजी बँकेत 10 रूपयांचे नाणे भरण्यास गेले असता बँकेने ते स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्याविरूध्द अर्जदार यांनी जिल्हा अग्रणी बँकेकडेही लेखी तक्रार केली. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. म्हणून अर्जदार यांनी अॅड. दत्तराव पी. झुटे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे रीतसर तक्रार दाखल केली. यामध्ये तक्रार अर्जाला उत्तर देत असताना युनियन बँकेने आपल्या वकीलामार्फत 10 रूपयांचे शिक्के हे कधीही बंद झालेले नाहीत. तसेच सदर ग्राहक हा दहा रूपयांचे शिक्याचा देणे घेण्याचा व्यवहार आजपर्यंत करीत आलेला आहे. अर्जदार हा बँकेचा ग्राहक असून बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होता असे खोटे आरोप केले. परंतु मा. जिल्हा ग्राहक न्याय मंचच्या अध्यक्षा श्रीमती ए.जी. सातपुते व सदस्या सौ. किरण मंडोत यांनी सर्व सत्यता पडताळून अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करून बँकेस अर्जदाराकडून 10/- रूपयांची नाणे स्विकारून अर्जदाराच्या बचत खात्यात जमा करण्याचे आदेश दिले. तसेच बँकेला अर्जदारास मानसिक त्रासापोटी रूपये 1000 व तक्रार खर्च म्हणून रूपये 500/- देण्यात यावेत असे आदेश दिले. अर्जदाराच्या वतीने अॅड. दत्तराव झुटे यांनी तर बँकेच्या वतीने अॅड. अनिल पा. ताठे यांनी काम पाहिले.

No comments:
Post a Comment