लातूर जिल्ह्यात औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Saturday, September 29, 2018

लातूर, दि. २८ : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टस अँड ड्रगिस्ट च्या आवाहनानुसार औषधांच्या ऑनलाईन विक्री व ई - फार्मसीजच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या औषधी विक्रेत्यांच्या देशव्यापी बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील साधारणतः दिड हजार औषधी विक्रेत्यांनी या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला. औषधी विक्रेत्यांनी गंज गोलाईतून भव्य मूक मोर्चा काढून अन्न व औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. 

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याबाबतचा जो आदेश किंवा ई - फार्मसीजना संपूर्ण भारतात कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला होता. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून ते शुक्रवारच्या मध्यरात्रीपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी शुक्रवारी सकाळी लातूर शहरातील गंज गोलाईपासून भावुक मूक मोर्चा काढला. या मूक मोर्चात लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनसह लातूर व्यापारी महासंघ, शहरातील दयानंद फार्मसी महाविद्यालय, चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयव बसवेश्वर फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 

या बंदला रिटेल कंझुमर असोसिएशन, भांडी असोसिएशन, सराफ असोसिएशन, रेडिमेड असोसिएशन, किराणा व्यापारी असोसिएशन, दुचाकी - चार चाकी वाहन व्यापारी असोसिएशन सह विविध व्यापारी संघटनांनी आपला सक्रिय पाठिंबा दिला होता. 

औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनांत ऑनलाईन कंपन्या सर्रासपणे औषधी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत असून संबंधित विभागाचे अधिकारीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घटक असलेल्या ऑनलाईन औषधी विक्रीवर तात्काळ निर्बंध घालण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, पंतप्रधानांनीही पाठविण्यात आल्या आहेत. 

लातूर जिल्हातील सर्व तहसिल क्षेत्रांतील औषधी विक्रेत्यांनी आपआपल्या क्षेत्रांतील तहसिलदार , उपविभागीय अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. हा बंद व मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बोधकुमार चापसी, सचिव रामदास भोसले यांसह ओमप्रकाश बाहेती, ईश्वर बाहेती, हरीशचंद्र बलशेटवार , अतुल कोटलवार , अंकुश भोसले, अनिल स्वामी, रमेश भांगडिया, प्रकाश रेड्डी, शिरीष कोटलवार , नागेश स्वामी, राजकुमार राजारूपे, अरविंद औरादे , रविंद्र दरक, मनोज आगाशे, संजय कर्वा आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment