परभणीत आयुष्यमान भारतचे उद्घाटन प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – पी. शिवशंकर

Monday, September 24, 2018

परभणी, दि.23 – आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेचा लाभ परभणी जिल्हयातील दिड लाख कुटुंबातील सदस्यांना होणार असून या योजनेचा त्यानी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रांची येथे आज आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्र शासनाच्या योजनेच्या अंमल बजावणीचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला राठोड, महापौर मिना वरपुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावना नखाते, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जावेद अथर आणि मान्यवर उपस्थित होते.

परभणी जिल्हातील स्वाती क्रीटिकल केअर हॉस्पीटल, परभणी, चिरायू हॉस्पीटल, परभणी आणि स्पर्श रुग्णालय, परभणी या तीन रुग्णालयांना या योजनेच्या लाभासाठी नोंदणी कृत करण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी यांनी लाभार्थ्यांनी आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालयात आपले औषधोपचार होऊ शकतील असे सांगितले. राज्य शासनातर्फे ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सुरु राहणार असून त्याचाही लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा असेही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर म्हणाले.

या योजनेअंतर्गत गरीब लाभार्थ्यांना प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचा औषधोपचार नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये मोफत स्वरुपात मिळणार आहे. या योजनेमुळे आर्थिकष्ट्या कमकुवत वर्गाकडून आपल्या आरोग्य उपचाराकडे दूर्लक्ष होणार नाही. यासाठी कोणताही खर्च येणार नसल्याने रुग्ण आपला उपचार करुन घेऊ शकतील असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती भावना नखाते यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोरगरीबांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी महात्वाकांक्षी योजना असून याचा लाभ गरीब रुग्णांनी घ्यावा असे आवाहन केले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला राठोड यांनी गोरगरीबांना आरोग्य सेवा मोफत देणा-या या योजनेबद्दल शासनाचे अभिनंदन करुन यामुळे आर्थिकदृष्टा कमकुवत कुटुंबांना फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.महानगर पालिकेतील आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी योवळी योजनेमुळे महागडी आरोग्य सेवा गरीबांना मोफत मिळणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. जावेद अथर यांनी योजनेची माहिती दिली.

No comments:

Post a Comment