काका मला वाचवा ...... बाप्पाचा फेरफटका

Sunday, September 16, 2018


निलंग्यात पुजा आणि आरती झाल्यानंतर बाप्पा आणि उंदीरमामा परत फिरले. आलेल्या मार्गाने परत जावे तर पुन्हा कोणीतरी अडवेल अशी शंका होती. त्यामुळे मधल्या मार्गे लातूरला जाऊ असा सल्ला उंदीरमामाने दिला . जाता -जाता लोदगा येथेही डोकावता येईल असे त्याने सांगितले .उंदीरमामाच्या सांगण्यास बाप्पाने होकार भरला .रस्त्यावरच्या खड्ड्यांची आता दोघांनाही सवय झाली होती .त्यामुळे कधी खड्डा चुकवत तर कधी उडी मारत प्रवास सुरू झाला.हळूहळू जात असताना कसला तरी आवाज येऊ लागला .


दोघांनीही कान टवकारले आणि आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला .खूप दूरवरून आवाज येत होता. 'काका मला वाचवा ,काका मला वाचवा 'असा तो आवाज ऐकून कोणीतरी संकटात असल्याचे लक्षात आले .काय असेल हा प्रकार ?येथे तर कोणी दिसत नाही ,असा विचार उंदीरमामा करू लागला. बाप्पाने मात्र डोळे मिटले तर रेणापूर येथून हा आवाज येत असल्याचे समजले .उंदीरमामा आणि बाप्पा पुढे येऊ लागले .रस्त्यात बाभळी असणारे एक गाव लागले. अचानकच काही मंडळी उंदीरमामाच्या समोर येऊन उभी राहिली .रस्ताच बंद झाल्याने उंदीरमामा आणि बाप्पालाही थांबावे लागले. 

तेथेही पुन्हा तोच आवाज येऊ लागला .थांबलेल्या त्या लोकांनी उंदीरमामाला गावात चलण्याचा इशारा केला .निघून जावे तर ही मंडळी रस्त्यातच आडवी असल्याने जाणे शक्य नव्हते .त्यामुळे उंदीरमामा आणि त्यावर बसलेला बाप्पा त्यांच्यामागे चालू लागले .गढी सारख्या एका वाड्यासमोर ही मंडळी थांबली .भैय्यांनी बोलावलंय असा निरोप देऊन ते पायऱ्या चढू लागले. त्यापाठोपाठ उंदीरमामा व बाप्पा आत गेले .यावे यावे असे म्हणत एक व्यक्ती समोर आली .भैय्या ,भैय्या असे लोक त्याला म्हणत होते .लगेचच बप्पाला आसन देण्यात आले. त्यावर बसलेला बप्पा विचार करू लागला .उंदीरमामाकडे मात्र कोणाचेच लक्ष नव्हते .त्यामुळे तो आपले काम करू लागला . जमलेले लोक कोण असावेत आणि यांचे काय काम असावे ?शिवाय त्यांनी आपल्याला अधिकृत बोलावलेही नव्हते. उंदीरमामा अंदाज बांधायला लागला .त्यापैकी एक जण धीर धरून ग्रामीण भागात जाण्यासाठी इछुक होता .

एक संतोषी असल्याचे जाणवत होते .वेताळाच्या गोष्टी सांगणारा विक्रमही तेथे होता .अनेक दिवस रुसून बसलेला व्यंकटेश पुन्हा पावल्याचे दिसत होते .मोती आणि पवळे यांचीही रास दिसू लागली होती .श्रीशैल्य महादेव तसेच सुळ घेतलेला एक दिवा तेवत होता .विक्रांत नावाचा एक गोरागोमटा तरुण इकडून तिकडे फिरत होता आणि या सर्वांच्या पलीकडच्या बाजूला एक दगड पडलेला होता . हा लवाजमा भैय्यांच्या मागेपुढे कायमच असतो हे उंदीरमामाने जाणले .दरम्यानच्या काळात हातवारे, इशारे करत भैय्या बप्पांना काही माहिती देत होते . उरकून घ्या असा इशारा केल्यानंतर पूजा सुरू झाली. आता मात्र बाप्पाला राहवले नाही .त्याने डोळे मिटले आणि संपूर्ण चित्रपट त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला .आई-वडिलांचं लाडकं लेकरू असणारा आणि धाकट्या भावांनी भैय्या बनवलेला असा हा भैय्या महत्वकांक्षी होता .

संपूर्ण राज्य आपलेच असावे अशी इच्छा मनात धरून त्याने केलेली तयारी बप्पांनी मनोमन पाहिली .पण त्यात वारंवार आडकाठी येत असल्याचे जाणवले .दरम्यान पूजा संपली आणि आरती सुरू झाली. मागच्या खेपेला मंत्रीपदाची शंभरीही पूर्ण झाली नाही. पुढच्या वर्षी मात्र प्रमोशन हवे, असे मनातल्या मनात बोलत भैय्या आरती करत असल्याचे बप्पाच्या लक्षात आले .जिल्हाच नाही तर राज्याचे नेतृत्व करण्याची आमची क्षमता आहे पण शहराच्या बाहेरही कोणी जाऊ देत नाही .पुढच्या वर्षी मात्र लाल दिव्याच्या गाडीत बसूनच तुमच्या पूजेला येतो असा विचार सुरू होता .मागच्या बाजूला धीराने उभा असणारा तरुण खेड्याकडे चला असे सांगत असला तरी तो 'जसा असावा तसा भाऊ 'असल्याचे बप्पाच्या लक्षात आले .

.येवढे असुनही कोणी विचारीत नसल्याने आता काकांचा सल्ला घ्यावा लागेल म्हणून रेणापूरातूनच काका मला वाचवा अशी आरोळी याच व्यक्तीने ठोकली होती ते आता बप्पाला समजले .पण आता काका नेमका कोण ?तो कसा आहे ?हे बप्पाला पहायचे होते. काका इथे उपस्थितही नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काकांशी बोलतो असे सांगत बप्पांनी उंदीरमामाला निघायचा इशारा केला .मी सोडतो ना असे भैया म्हणू लागला पण नको - नको म्हणत बप्पा लातूरकडे निघाला .मागोमाग चार-पाच गाड्या येऊ लागल्या .आता काकांना भेटूच असे बप्पा उंदीरमामाला म्हणाला घर शोधत शोधत उंदीर मामा औसा रस्त्याला आला . एका घरापुढे अनेक गाड्या उभ्या होत्या .काकांचे घर हेच आहे याची खात्री झाल्यानंतर उंदीरमामा आणि बप्पा आत निघाले पण गेटवरच त्यांना अडवण्यात आले .काकांची मीटिंग सुरू आहे ,ते आता भेटणार नाहीत असे वॉचमन म्हणू लागला .भैयाविषयी बोलायचे आहे असे उंदीरमामाने सांगितले पण हे काका 'तसे' नाहीत असे तो सांगू लागला .अनेकदा विचारूनही आत जायची परवानगी मिळत नसल्याने उंदीरमामा आणि बप्पाने आपला मोर्चा कैलासाकडे वळवला .तेथे तर वेगळाच प्रकार दिसून आला .

कैलासात राहणारे साहेब एका पक्षात तर त्यांचा मुलगा दुसरीकडे असल्याचे दिसून आले .त्यातही साहेबांना आमदार व्हायचे असल्याचे कार्यकर्ते सांगू लागले .बप्पा आल्याचे समजतात जननायक सामोरे आले .पाठोपाठ वहिनी आणि भैय्या दिसू लागले. दरवाजातच साहेबांनी आपले गाऱ्हाणे मांडायला सुरुवात केली . आम्ही लोकनेते आहोत, जननायक आहोत तरीही कोणी दखल घेत नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही याचा मला अनुभव आला आहे. आता तर नाका ऐवजी दुसरेच काहीतरी दाबण्याची वेळ आली आहे असे साहेब म्हणू लागले 

.इथे काहीतरी वेगळेच घडत आहे असे जाणवल्याने बाप्पाने तेथील पुजा टाळली .सदिच्छा भेटीसाठी आलो होतो असे सांगत काढता पाय घेतला. गंजगोलाई ,सुभाष चौकात जाऊन काही फुले घ्यावी असे बप्पाच्या मनात आले .बप्पांची स्वारी चौकात आली तर कंपाउंड मध्ये लोक कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसून आले. हे लोक का थांबले असतील ते पाहावे म्हणून बप्पा आणि उंदीरमामा कंपाउंड मध्ये शिरले तर भैया झोपेतून उठले नसल्यामुळे त्यांची वाट पाहत ही मंडळी थांबल्याचे सांगण्यात आले. आता इथे कशाला थांबा असा विचार करत उंदीर मामा कंपाउंड मधून बाहेर पडले. आता कुठे जावे असा विचार करू लागले तेवढ्यात एक व्यक्ती हात जोडून समोर उभा राहिला .मी राजा आहे ,सर्व धर्मांना मानतो .आजची आरती मला करु द्या असे म्हणू लागला. पण बप्पांचा मूड काही वेगळाच दिसून आला .....

श्रीकांत धर्माधिकारी  मो .९४०३४८९५९५

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment