नवी दिल्ली :.लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचे समर्थन करणाऱ्या टीआरएसने अचानक विधानसभा का बरखास्त केली, असा सवाल तेलंगणाच्या एक दिवसीय दौऱ्यावर गेलेल्या अमित शाह यांनी उपस्थित केला. तेलंगणासारख्या छोट्याशा राज्यातील जनतेवर दोन निवडणुकांच्या खर्चाचे ओझे टाकण्यात आले आहे. टीआरएसने ९ महिने अगोदर लोकांवर निवडणूक लादली आहे. लोक सर्व पाहत आहेत. त्यामुळे भाजप प्रत्येक जागेवर ताकदीने निवडणुकीत उतरेल, असे शाह म्हणाले.
तेलंगणात विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सत्ता सोडण्याची मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची खेळी म्हणजे राज्यातील जनतेवर अन्याय असल्याची टीका करत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजप राज्यातील सर्व विधानसभा जागा लढविणार असल्याचे सांगत मोदींच्या नेतृत्वाखाली पक्षाला मोठा विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दलित मुख्यमंत्री देण्याचे आश्वासनदेखील टीआरएसने पाळले नाही. टीआरएस आरक्षणाचे राजकारण करत आहे; पण त्यांना निवडणुकीत यश मिळणार नाही. आम्ही टीआरएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांविरोधात मैदानात उतरलो आहोत, असे शाह म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना यासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती जबाबदार असल्याचे भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण आणि इतर आंतरराष्ट्रीय घटना इंधन दरवाढीसाठी कारणीभूत आहेत. अमेरिका-चीनदरम्यानचे व्यापार युद्ध आणि अमेरिका व तेल उत्पादक देशामधील बाबीदेखील याचाच भाग आहे. सरकारदेखील यासंदर्भात विचार करत असून, लवकरच यावर काही तरी तोडगा काढला जाईल, असे शाह म्हणाले.

No comments:
Post a Comment