दुबई : आयसीसी विश्वचषक स्पर्धेला अद्याप आठ महिने असले तरी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारपासून सुरू झालेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतीय संघाची एकत्रित बांधणी करण्यासाठी योग्य संधी आहे असे वाटते..या स्पर्धेमुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी करता येईल का? या प्रश्नाला उत्तर देताना कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले, विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला चांगली कामगिरी करावी, असे वाटत असते. त्यासाठी संघातील खेळाडूंच्या मनाची तयारी चांगली असणे आवश्यक असते. पण सध्या तरी विश्वचषक स्पर्धेचा विचार करू नये, असे त्याला वाटते.
आशिया चषक स्पर्धेमुळे विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघाची बांधणी करण्याची संधी प्रत्येक संघाला मिळेल, असे त्याला वाटते. एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने सांगितले, विश्वचषक स्पर्धेचा विचार माझ्या डोक्यात नक्कीच आहे, पण सध्या तरी आम्ही एकेक सामन्याचा विचार करणार आहोत. त्याने पुस्ती जोडली की, श्रीलंकेचा कर्णधार एंजेलो मॅथ्युज, पाकिस्तानचा कर्णधार सरफराझ अहमद आणि बांगलादेशचा कर्णधार मश्रेफ मोर्ताझा यांचे याबाबतीतील विचार काय आहेत, याची मला कल्पना नाही. पण स्पर्धा पुढे सरकत जाईल तेव्हा आम्हाला कळून चुकेल की या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाची रणनीती कशी आहे? त्यानंतरच आम्ही डावपेच आखू. आशिया चषक स्पर्धेसाठी विराट कोहलीला निवड समितीने विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेबाबत तो म्हणाला, आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला अद्याप खूप अवधी आहे. तत्पूर्वी आम्ही बरेच सामने खेळणार आहोत. त्यामुळे अनेक होतकरू खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार आहे. .
भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबरला हाँगकाँग संघाशी आहे. दुसऱ्याच दिवशी कर्णधार रोहित शर्माच्या संघाला आव्हान असेल ते पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे. त्या सामन्याविषयी विचारले असता रोहित शर्मा म्हणाला, अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तान संघाने अनेक विजय मिळवले आहेत. अशा संघाविरुद्ध खेळण्याचे वेध आम्हाला लागले आहेत. पण त्याचा अर्थ असा नव्हे की, केवळ त्या सामन्यावरच आमचे लक्ष असेल. कारण या स्पर्धेत खेळले जाणारे इतर सामनेही खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक संघाच्या कर्णधाराला आपला संघ विजयी व्हावा, असेच वाटत असणार. भारताच्या कर्णधाराने मग पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले की, प्रथमच तो पूर्ण स्पर्धेसाठी कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे हा अनुभव आपल्यासाठी विलक्षण असेल, असे त्याला वाटते. याआधी आयपीएल स्पर्धेनिमित्त आणि त्यानंतर २००६ साली तो भारतीय 'अ' संघासाठी दुबईत खेळला होता..
भारतीय संघ .
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, खलील अहमद..

No comments:
Post a Comment