दुबई : आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेश संघाने श्रीलंकेचा १३८ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.दुबई येथे आशिया चषकाचा पहिला सामना शनिवारी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने ४९.३ षटकांत सर्व गडी बाद २६१ धावा उभारत श्रीलंकेला विजयासाठी २६२ धावांचे लक्ष्य दिले.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या उपुल थरंगाने जलद गतीने सुरुवात केली, मात्र तिसऱ्या षटकात सलामी जोडी फोडण्यात मुस्तफिजूर रहमानला यश आले. त्याने कुसल मेंडीसला भोपळाही न फोडू देता पायचित करत २२ धावांवर पहिला फलंदाज बाद केला. तर, संघाच्या खात्यात अवघ्या २ धावांची भर पडली असताना उपुल थरंगाचा मोर्तजाने दांडा उडवला. त्याने १६ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकारासह २७ धावा केल्या. उपुल बाद झाल्यावर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. थोड्या थोड्या धावांच्या फरकाने धनंजया डिसिल्वा (०), कुसल परेरा (११), दासुन शनाका (७), ॲंजेलो मॅथ्युज (१६), थिसारा परेरा (६), सुरंगा लकमल (२०), दिलरुवन परेरा सर्वाधिक २९ धावा करुन बाद झाला. ३६ व्या षटकात अमिला अपोन्सो ४ धावांवर झेलबाद झाला तर लसीथ मलिंगा ३ धावांवर नाबाद राहिला. परिणामी श्रीलंकेचा डाव ३५.२ षटकात सर्वगडी बाद १२४ धावांवर आटोपला. आणि बांगलादेशने हा सामना १३८ धावांनी जिंकला.
तत्पूर्वी, मुशफिकर रहीम याने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने श्रीलंकेसमोर २६१ धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने ४ गडी बाद करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार पुनरागमन केले.
मुशफिकरने १५० चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने १४४ धावा फटकावीत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी साकारली. मोहम्मद मिथुन (६३) बरोबर तिसऱ्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी सोडली तर मुशफिकरला अन्य फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. मलिंगाने अखेरचा सामना घरच्या मालिकेमध्ये भारताविरुद्ध सप्टेंबर २०१७ मध्ये खेळला होता.
त्याने आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात २३ धावांत ४ गडी बाद केले. सलामीवीर तमिम इक्बाल जखमी निवृत्त झाल्यानंतरही फलंदाजीला उतरला. त्यामुळे त्याच्या या धाडसाचे क्रिकेटप्रेमींनी कौतुक केले. .

No comments:
Post a Comment