लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची एका कार्यकर्त्यावर २० घरांची जबाबदारी

Monday, September 17, 2018

नवी दिल्ली : आगामी सार्वत्रिक निवडणुकीत २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजप 'टी-ट्वेंटी' फॉम्र्युला वापरणार आहे. या योजनेंतर्गत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता किमान २० घरांत चहापाणी घेऊन त्या घरांतील सदस्यांना मोदी सरकारची महती पटवून सांगणार आहे. याशिवाय भाजपने 'हर बुथ-दस युथ', 'नमो ॲप संपर्क' तथा 'बुथ टोळ्यां'च्या माध्यमातूनही मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्याचे नियोजन केले आहे.

'भाजपने आपल्या सर्वच नेत्यांना व कार्यकर्त्यांना आपापल्या क्षेत्रातील जनतेपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचविण्याचे निर्देश दिलेत. विशेषत: कार्यकर्त्यांना प्रत्येक गावात जाऊन किमान २० घरांत चहापाणी घेण्याची सूचना करण्यात आली आहे,'अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने रविवारी दिली. प्रस्तुत 'टी-ट्वेंटी'चा उद्देश जनतेशी थेट संवाद प्रस्थापित करण्याचा आहे. २०१४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी आक्रमक प्रचारशैली स्वीकारली होती. यात त्यांनी माहिती-तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केला होता. याचे खास आकर्षण 'थ्रीडी' रॅलींचे आयोजन हे होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जोडण्यासाठी त्यांनी 'चाय पे चर्चा'चेही आयोजन केले होते. आगामी निवडणुकीत भाजप या योजनांचा अधिक विस्तार करणार आहे. याअंतर्गत भाजपने बुथ स्तरासाठी एक विस्तृत रणनीती तयार केली आहे. यात कार्यकर्त्यांना जनतेला नरेंद्र मोदी ॲपशी जोडण्याचे निर्देश देण्यात आलेत

पक्षाने प्रत्येक मतदान केंद्रावरील किमान १०० लोकांना या ॲपशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक बुथवर प्रमुख कार्यकर्त्यांची एक टोळीही तयार करण्यात येणार आहे. ही टोळी भाजप सरकारच्या योजनांची माहिती जनतेला देईल. 'प्रत्येक बुथवर किमान २० नवे सदस्य जोडण्याचा आमचा प्रयत्न असेल,' असे भाजपने म्हटले आहे. प्रत्येक बुथवर जवळपास २ डझन कार्यकर्त्यांची टोळी तयार केली जाईल. ही टोळी नियमितपणे सकाळ-संध्याकाळ व सुट्टीच्या दिवशी घरोघरी जाऊन लोकांची भेट घेईल. सोबतच दुकानदार व अन्य छोटी-मोठी कामे करणाऱ्यांशीही संपर्क साधेल. मोदी सरकार देशासाठी किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचे काम हे कार्यकर्ते करतील..

No comments:

Post a Comment