प्रशांत किशोर 'जदयु'त

Monday, September 17, 2018

पाटणा : आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी 'जदयु'त प्रवेश केला.


मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या येथील सरकारी निवासस्थानी झालेल्या जदयुच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी जदयुचे सदस्यत्व ग्रहन केले. यावेळी नितीश यांच्यासह जदयुचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार वसिष्ठ नारायण सिंह यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. बैठकीत प्रशांत किशोर नितीश यांच्या डाव्या बाजूला बसले होते. ४१ वर्षीय प्रशांत किशोर बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी बिहारमधील आपल्या नव्या प्रवासाविषयी अत्यंत उत्सुक असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यांच्यावर पक्षातील कोणती जबाबदारी सोपविण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी ते राजकीय आखाड्यात उतरल्याने ते २०१९ मध्ये जदयुतर्फे लोकसभेची निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. २०१२ची गुजरात निवडणूक व २०१४च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी रणनीती तयार केली होती. त्यांच्या व्यूहरचनेमुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान विजय मिळाला होता. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी भाजपच्या प्रतिस्पर्धी पक्षांशी हातमिळवणी केली होती. २०१५च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राजद-जदयुच्या महाआघाडीसाठी काम करत भाजपला पराभवाचा धक्का दिला होता. तद्नंतर नितीश यांनी त्यांची आपल्या सल्लागारपदी नियुक्ती केली होती. दरम्यान, प्रशांत किशोर यांना काँग्रेसला उत्तर प्रदेशात विजय मिळवून देण्यात अपयश आले. मात्र, पंजाबमध्ये ते यशस्वी झाले होते..

No comments:

Post a Comment