नवी दिल्ली :
मोदी सरकार वर्ष २०२२ पासून देशाचा पहिला उच्च गतीचा रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याची तयारी करत आहे. यासाठी भारत सरकारने जपानकडून १८ बुलेट ट्रेनची खरेदी करण्याची तयारी सरकार करत आहे. हा सौदा जवळपास ७००० कोटींचा होईल आणि याअंतर्गत देशात रेल्वेच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अटीचा समावेश असणार आहे.
देशातील पहिला उच्चगती रेल्वे कॉरिडॉर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू होणार आहे. ५०८ किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरसाठी सरकार १८ बुलेट ट्रेनची खरेदी करणार आहे. या कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनची गती ३५० किलोमीटर प्रतितास असणार आहे. यामुळे अहमदाबाद ते मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त २ तास लागणार आहेत. हे अंतर पार करण्यासाठी भारतीय रेल्वेला सध्या ७ तासांचा वेळ लागतो. याबाबत माहीती देताना, आम्ही जपानकडून १८ शिंकनसेन ट्रेनचे सेट मिळवीत आहोत. प्रत्येक ट्रेनमध्ये १० कोच असतील आणि याची गती प्रतितास ३५० कि लोमीटर असणार आहे. ही बुलेट ट्रेन खरेदी करण्यासाठी सरकार लवकरच टेंडर जारी करेल आणि जपानी कंपन्यांना यात समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने म्हटलेले आहे.
याशिवाय भारतीय रेल्वे सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी)च्या आधारावर देशात एक बुलेट ट्रेन जुळवणी युनिट (असेम्बलिंग युनिट) स्थापन करण्याची प्रक्रिया राबवत आहे. जपानी बुलेट ट्रेन निर्माता कंपन्या 'कावासकी' आणि 'हिताची' देखील भारतात आपला कारखाना स्थापन करू शकणार आहेत. भारतात जुळवणी कारखाना स्थापन करण्यासाठी 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत निविदा मागवल्या जाणार आहेत. अधिक माहितीनुसार, रेल्वेने बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण डिसेंबर, २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवलेले असून जानेवारीपासून बांधकामास सुरुवात केली जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment