कृष्णलिलेने भाविक मंत्रमुग्ध हिंगोलीत आप्पाबाबांचे अनुष्ठाण

Wednesday, August 22, 2018



हिंगोली / प्रतिनिधी 
येथील शास्त्री नगर भागात दिलीप गुंडेवार यांच्या निवासस्थानी रूईभर संस्थान निवासी आप्पाबाबा श्रावण मासानिमीत्त अनुष्ठाण प्रवचन कार्यक्रमाला बसले आहेत. 21 ऑगस्ट रोजी आप्पाबाबांनी आपल्या खास शैलीत कृष्णलिलेचे वर्णन केले. यावेळी उपस्थित भाविकांना गोकुळाचा साक्षात्कार झाला होता. 

     मंगळवारी आप्पा बाबा यांनी श्रीकृष्ण जन्म गोवर्धन पुजा व छपन्न भोग यावर आपले प्रवचन केले. आप्पाबाबांनी श्रीकृष्ण जन्मापासून गोकुळातील गमती जमती सांगितल्या. श्रीकृष्ण जन्माच्या वेळेस कंस मामा यांनी अनंत अडचणी आणल्या. श्रीकृष्णाला संपविण्यासाठी ना ना प्रयत्न केले. पण तो कसला संपतो. तो तर देव आणि गोकुळात कृष्णाचा जन्म झाला. संपुर्ण गोकुळ भगवंताला पाहण्यासाठी उत्साहीत झाले होते. खुद्द महादेवही श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यानंतर श्रीकृष्णाला संपविण्यासाठी पुतना मावशी सौदर्यवतीचे रूप धारण करून आली. गोकुळातील सर्व लहान बालकांना विषारी स्तनपान करायला लागली. कृष्णावरही तिने हाच प्रयोग केला. कृष्णाने तिचे सर्व दुध पिवून घेतले आणि नंतर रक्त यायला लागले. त्यानंतर पुतना मावशीने दया याचना करून स्वत:चा मोक्ष करून घेतला. त्यानंतर आप्पाबाबा यांनी बालकृष्णाच्या गोकुळातील एक-एक लिला उलघडल्या. श्रीकृष्ण दही, दुध, तुप चोरायचे, गवळणीच्या खोड्या काढायचे, नवरा बायकोंची भांडणे लावायचे अशा ना ना लिला कृष्णांनी केल्या. आपल्या सवंगड्यांना घेवून भगवान श्रीकृष्ण हमामा, हुमरे, हुतूतू, विटू दांडी असे एक ना अनेक खेळ खेळायचे. पुढे चालून संपुर्ण गोकूळाला पाण्यापासून वाचविण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन आपल्या करंगळीवून उचलून धरले. व गोकुळाला आलेले संकट निवारण केले, असे सांगत आप्पा बाबा यांनी छपन्न भोगाचे महत्वही सांगितले. छपन्न भोग म्हणजे व्याधी, रोग होय. त्यासाठी आपण भगवंताला छपन्न भोग देवून तृप्त करीत आहोत. आणि आपल्या सर्वांना छपन्न व्याधीतून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करीत आहोत. भगवंत आपली प्रार्थना नक्की ऐकेल. आणि आपल्याला सुखी, समाधानाचे दिवस आणेल असा आशावाद महाराजांनी व्यक्त केला. महाराजांनी आपल्या खास शैलीत केलेले श्रीकृष्णाचे वर्णन ऐकून सर्वच भक्तांना गोकुळातील जीवंत देखावा उपस्थित झाला होता. शेवटी दहीहंडीचा प्रसाद सर्वांना देण्यात आला. या प्रवचन कार्यक्रमाला महिला, पुरूष भक्तांची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment