‘संजू’वर उज्ज्वल निकम यांनीसुद्धा उपस्थित केले काही प्रश्न

Saturday, July 7, 2018

मुंबई,६ 
अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटात बर्‍याच गोष्टी जाणीवपूर्वक दाखवण्यात आल्या नाहीत असे मत अनेकांनी मांडलं आहे. मग ते त्याच्या पहिल्या दोन पत्नीविषयी असो किंवा मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्याच्याजवळ आढळलेले सात हँडग्रेनेड असो, चित्रपटातअशा काही गोष्टींचा उल्लेखही का केला नाही असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीसुद्धा यावर काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘संजू’ चित्रपटाविषयी वक्तव्य केले आहे. एका टेम्पोमधून हँडग्रेनेड आणि रायफल घेऊन १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम संजय दत्तच्या घरी आला होता. त्याच्या घरी पाच एके ५६ रायफल्स आणि सात हँडग्रेनेड काही दिवस ठेवण्यात आले होते हे या चित्रपटात का दाखवण्यात आले नाही? असा प्रश्‍न निकम यांनी उपस्थित केला.

संजयच्या घरी वडील खासदार असल्याने पोलीस संरक्षण होतेच. मग संरक्षणाच्या नावाखाली शस्त्र बाळगण्याचे कारण सांगत स्वत:चा बचाव आहे की त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे सुद्धा चित्रपटात दाखवणे आवश्यक होते. अशी शस्त्र व हँडग्रेनेड बॉम्बस्फोटापूर्वी घेऊन अबू सालेम आला होता, ही बाब पोलिसांना जर संजयने कळवली असती तर निरपराध लोकांचे प्राण वाचले असते. त्याला आता याबद्दल काय वाटते, हेही चित्रपटात दाखवायला हवे असल्याचेही ते म्हणाले.

एखाद्या व्यक्तीवर बायोपिक बनत असेल तर त्यात वास्तव गोष्टींचा उल्लेख करणे अपेक्षित असते, पण गुन्ह्यांवर सहानुभूती मिळवण्यासाठी पडदा टाकला जाऊ शकत नाही किंवा प्रसारमाध्यमांवर त्याचे खापर फोडून चालत नसल्याचा टोलाही त्यांनी दिग्दर्शकांना लगावला आहे.

No comments:

Post a Comment