लातूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावेत याकरीता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आग्रही आहेत. जिल्ह्यातील नागरिकांसह रुग्णांना उच्चदर्जाच्या आरोग्यसेवा मिळाव्यात याकरीता पालकमंत्री सातत्याने प्रयत्नशील आहेत. या माध्यमातूनच जगातील पहिले रेल्वे हॉस्पिटल म्हणून लाईफलाईन एक्सप्रेस लातुरात दाखल झाली होती. १६ जून ते ४ जुलै यादरम्यान या रेल्वे हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील रुग्णांच्या विविध तपासण्या करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली ऊन शेकडो रुग्णांना उपयोगी उपकरणांचे वाटप करण्यात आले.
लाईफलाईनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६ हजार ५६० रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ७५० जणांवर शस्त्रक्रिया तर ८३१ रुग्णांना उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे.पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून लातूर येथील रेल्वे स्थानकावर जगातील पहिले रेल्वे रुग्णालय असलेली लाईफलाईन एक्सप्रेस दाखल झाली होती. दि. १६ जुलै रोजी या रेल्वे रुग्णालयाचा शुभारंभ पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. सदर रेल्वे रुग्णालय दि. १६ जून ते ४ जुलैदरम्यान रेल्वेस्थानकावर थांबून होते. यावेळी जिल्ह्यातील हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.
यामध्ये २२८० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून यात ५११ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तर ५११ रुग्णांना चष्म्याचे वाटपही करण्यात आले आहे. कान-नाक-घसा या विकारासाठी जिल्ह्यातील १३५३ रुग्णांनी तपासणी करण्यात आली असून ७० जणांवर कानाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच ३२० गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटपही करण्यात आले. ३३ गरजू रुग्णांना प्लास्टिक सर्जरीसाठी तपासणी करून घेतल्यानंतर ११ जणांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. याबरोबर जिल्ह्यातील ९० रुग्णांनी हाडाच्या रोगाची तपासणी करून घेतली असून १८ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
पालकमंत्री निलंगेकर यांनी कॅन्सरमुक्त जिल्हा करण्याचे धोरण आखलेले असून त्या अनुषंगाने लाईफलाईनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी व शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये तोंडाच्या कर्करोगासाठी ३३३ जणांनी तपासणी करून घेतली तर गर्भाशय कर्करोग तपासणी ४९७ गरजू रुगंणांनी करून घेतली आहे. जिल्ह्यातील ११ रुग्णांनी मॅमोग्राफी तपासणी झालेली आहे. फिट्स (मिरगी) या रोगाची तपासणी ६४ रुग्णांनी करून घेतली आहे. जिल्ह्यातील ११९४ रुग्णांनी दंतरोगाची तपासणी करून घेतल्यानंतर २९९ गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया व इतर प्रक्रिया करण्यात आल्या.
पक्षघात (लकवा) प्रतिबंधात्मक तपासणीसाठी ७१६ रुग्णांनी लाभ घेतला. या लाईफलाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६ हजार ५६० रुग्णांची तपासणी झाली असून यामध्ये ७५० जणांवर आवश्यक शस्त्रक्रिया तर ८३१ रुग्णांना आवश्यक यंत्र व उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून लातुरात दाखल झालेल्या या एक्सप्रेसच्या माध्यमातून ज्या रुग्णांची तपासणी किंवा शस्त्रक्रिया झाली ती मोफत झालेली आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उच्च दर्जाच्या सेवा मिळाल्याबद्दल पालकमंत्री निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येऊन भविष्यात असा उपक्रम राबविण्यात यावा, अशी अपेक्षाही जिल्हावासियांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment