मान्सुनपुर्व पावसाचा तडाखा;वीज पुरवठा खंडीत

Saturday, June 2, 2018
नांदेड/प्रतिनिधी- गेल्या अनेक दिवसापासून उकाडयाने त्रस्त झालेल्या नांदेडकरांना गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. या पावसाने अनेक सखल भागात पाणीच पाणी झाल्याने महापालिकेच्या कार्यक्षमता स्पष्ट झाले आहेत. मानसूनचे यंदा लवकर आगमन होणार असल्याचे हावामान विभागाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. 
गेल्या दोन दिवसापासून नांदेडच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ४४ अंश सेल्सियसने पारा ओलांडल्याने नांदेडकरांची लाहीलाही झाली. गुरूवारी रात्री १० वाजता मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. सुमारे दोन ते तीन तास हा पाऊस सुरू होता. अचानकपणे वादळवार्‍यासह झालेल्या या पावसाने शहरातील तरोडा नाका, लोकमित्र नगर, शिवाजीनगर, आयटीआय, गाडीपुरा, पावडेवाडी नाका, सांगवी, तरोड आदी भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना संपुर्ण रात्र अंधारात काढावी लागली.
सतत तीन तास झालेल्या या पावसाने सखल भागात पाणीच पाणी साचले होते. काही भागातील रस्ते देखील पाण्याखाली आल्यामुळे वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाळयापुर्वी आवश्यक असणारी साफसफाई करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला होता. परंंतु अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्याने मनपाच्या कामाचे पितळ उघडे पडले. अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील पाणी काढण्यातच रात्र घालावी लागली.
दरम्यान अर्धापूर, मालेगांव, मुदखेड, कहाळा, मार्तळा, सोनखेड, लोहा, मुखेड परिसरात मध्यम पावसाची नोंद झाली. धर्माबाद तालुक्यात विजेच्या तारा अंगावर कोसळल्याने दोन बैलांची मृत्यू झाला. 

No comments:

Post a Comment