वॉटर ट्रेन ते लाईफ ट्रेन

Monday, June 18, 2018

लातूरसाठी सरकारचे लागेल ते 

सत्यजीत बद्दर 

लातूर /प्रतिनिधी :देश व राज्यातील सरकार आणि सरकारमधील खुर्च्यावर बसणारी माणसं बदलल्यानंतर काय होते याचा प्रत्यय लातूरकरांना मागील दोन वर्षात येत आहे . पाण्याच्या थेंबासाठी लातूरकर तरसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला .आता लातूर दुष्काळमुक्त झाल्यानंतर लातूरकरांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत पुरविणारी लाइफ लाइन एक्सप्रेस लातूरला पाठवण्यात आली . त्यामुळे लातूरला जे लागेल ते पुरविण्याचा शासनाचा दृष्टिकोन दिसून आला .


केंद्र आणि राज्यात सत्तांतर करण्यासाठी लातूरकरांनी मोठा वाटा उचलला . विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही लातूर जिल्ह्याने भाजपाला सर्वाधिक यश मिळवून दिले .यामुळेच सरकारच्या माध्यमातून लातूरकरांना अधिकाधिक देण्याचा कल आजपर्यंत दिसून आला . रेल्वे बोगी कारखाना हे त्याचेच फळ म्हणावे लागेल .

दोन वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता . त्यावेळी केंद्रातील सरकारने रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करून आपल्या इच्छाशक्तीचा प्रत्यय दिला होता .तोच प्रत्यय आता पुन्हा एकदा येऊ लागला आहे . राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत . गोरगरिबांना मोफत उपचार मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे . तरीही काही घटक उपचारापासून वंचित राहतात . हे होऊ नये यासाठीच लाइफ लाइन एक्सप्रेस हा उपक्रम राबविला जात आहे .जगातील पहिले रेल्वे रुग्णालय लातूरात दाखल झाले आहे . या रेल्वेमध्ये तपासणीपासून शस्त्रक्रिये पर्यंत सर्व उपचार मोफत केले जात आहेत . 


शनिवार दिनांक 16 जून रोजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व खा . डॉ . सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत या लाईफ लाईन चे उद्घाटन झाले .उद्घाटनापूर्वी चारशे जणांनी तपासणीसाठी नोंदणी केली होती .शनिवार आणि रविवार या दोन दिवसात शेकडो रुग्णांनी या लाईफ लाईन एक्सप्रेसचा लाभ घेत स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घेतली .शनिवारी उद्घाटनाच्या दिवशीच तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली .पहिल्या टप्प्यात दिनांक 16 जून पासून नेत्र तपासणी केली जात आहे . शनिवारी 300 रुग्णाची नेत्र तपासणी करून त्यापैकी 62 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट करून घेण्यात आले . त्यातील 44 रुग्णावर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या .डायबेटीस व रक्तदाब कमी जास्त असल्यामुळे इतर रुग्णावर शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाहीत .रविवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 350 रुग्णांनी तपासणी करून घेतली . त्यापैकी 95 रुग्णांना ॲडमिट करून घेण्यात आले .150 रुग्णांच्या डोळ्यांचे चष्म्याचे नंबर तपासण्यात आले .लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी दोनशे खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे . एमआयटीच्या रुग्णालयात रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे . 

रुग्णांसोबत एक नातेवाईक राहण्याचीही सोय असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ .संजय ढगे यांनी दिली .लाइफ लाइन च्या माध्यमातून रुग्णावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .डॉ . श्रीधर पाठक हे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत .शनिवारी रमजान ईद असल्यामुळे रुग्णांचा प्रतिसाद कमी होता . रविवारी मात्र जिल्हाभरातील रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतला .लाइफ लाइन च्या माध्यमातून सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ . ढगे व डॉ . पाठक यांनी केले आहे .

आरोग्याच्या दृष्टीने लातूर जिल्हा सुदृढ व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांमुळेच लाइफ लाइन एक्सप्रेस सारखे जगातील पहिले रेल्वे रुग्णालय लातूरात दाखल झाले आहे . लातूर जिल्ह्यासह कर्नाटकाच्या सीमाभागातील हजारो रुग्णांना या रेल्वेचा लाभ होणार आहे .त्यामुळे नागरिक केंद्र व राज्य सरकार सोबतच पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचेही आभार मानत आहेत

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment