इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाचा लातूर पॅटर्न राज्यात राबविण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Monday, June 4, 2018

लातूर,दि. ०३:- इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार ते जलयुक्त आवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लातूरचा हा नवा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

लातूर येथे आयोजित इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतर्गत जलयोध्दांना मार्गदर्शन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंधारणमंत्री राम शिंदे, कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक अभिमन्यू पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे,जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड आदि उपस्थित होते.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, सततच्या टंचाईच्या परिस्थितीमुळे लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले, परंतु जलयुक्तच्या शिवार अभियानाच्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने लातूर जिल्हा टँकरमुक्त झाला व यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, प्रशासन व नागरिकांनी मेहनत घेतली, असे त्यांनी सांगितले.

राज्यात जलयुक्तच्या प्रभावी अंमलबजावणीतून १६ हजार गावे दुष्काळमुक्त झालेली आहेत. तर ङ्गजलयुक्त शिवार ते जलयुक्त आवारङ्ख ह्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान माध्यमातून रुफ वॉटर हार्वेस्टींग, बोअरवेल पुर्नभरण, विहिर पुर्नभरण व घर तिथे झाड हा चांगला उपक्रम राबविला जात असून जलयोध्दे भावी पिढींसाठी पाणीदार, हिरवं व पर्यावरणाचा समतोल असलेले लातूर निर्माण करतील , असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी रचनात्मक कामास महत्व असून पाणी व पर्यावरण संवर्धनाचे काम हे रचनात्मक काम आहे. कारण प्रत्येक संस्कृतीचा उदय व विस्तार नदीच्या किना-यावरच झालेला असून पाणी संपल्यानंतर संस्कृतीचा विनाश ही झालेला आहे, असे सांगून श्री. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान व इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाचे महत्व विशद केले. तसेच इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानात काम करणा-या जलयोध्दांना शुभेच्छा देऊन हे अभियान राबविणारे पालकमंत्री श्री. निलंगेकर, प्रशासन व लातूरचे नागरिक खरे जलनायक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून हजारो गावे दुष्काळमुक्त करणारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे जलनायक असल्याचे पालकमंत्री श्री. निलंगेकर यांनी म्हटले. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या माध्यमातून संपुर्ण लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच या अंतर्गत रुफ वॉटर हार्वेस्टींग, बोअरवेल पुर्नभरण, विहीर पुर्नभरण, प्रत्येक घरी, प्रत्येक घरी शोषखड्डा व घर तिथे झाड हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती श्री. निलंगेकर यांनी दिली. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष रोपन करुन संवर्धन केल्यास वेगळे पाच गुण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस व मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमेस व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर पालकमंत्री श्री. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री यांची स्वत:ची स्केच असलेली प्रतिमा त्यांना भेट म्हणून देण्यात आली. तसेच इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाची वस्तुस्थीती सांगणारा माहितीपट मुख्यमंत्री यांना दाखविण्यात आला.

यावेळी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियांतर्गतच्या उपक्रमांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच वृक्ष संगोपनाचे महत्व सांगणारी पुस्तिका व झाड देऊन इंद्रप्रस्थ अभियानात काम करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रमाणेच समाज कल्याण लातूरच्या संवेदना या दिव्यांग व्यक्तींच्या ऑनलाईन नोंदणी संकेतस्थळाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

मराठवाडा लोकल ते ग्लोबल ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देणार हक्काचे व्यासपीठ. 
http://www.mnetaonline.com 

No comments:

Post a Comment