शेतीच्या वादातून
हिंगोली / प्रतिनिधी
शेतीच्या वादातून हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात एकाच्या मानेवर वार करून निर्घुण खून केल्याची घटना १३ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली. तालुक्यातील सवड येथील सिताराम नारायण राऊत वय ५० असे मूर्त व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, खून केल्यावर आरोपी स्वत:हुन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हजर झाला असून रंगनाथ मोडे वय २२ वर्षे असे त्याचे नाव आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली तालुक्यातील पहेणी येथील रंगनाथ मोडे यांनी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात शेती संबंधीचा दावा सवड गावातील सिताराम राऊत यांच्याविरुध्द दाखल केला होता. दाखल केलेल्या या दाव्यावर १३ जून रोजी दुपारी 3 वाजता तहसील कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यामुळे राऊत व मोडे हे दोघेही तहसील कार्यालयात आले होते. तहसील कार्यालयाच्या बाहेरच रंगनाथ मोडे यांनी धारदार चाकुने सिताराम राऊत यांच्या मानेवर सपासप वार करुन पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. दरम्यान, जीवघेणा हल्ला झाल्यावर वाचवा वाचवा असा टाहो फोडत सिताराम राऊत हे तहसील कार्यालयाच्या इमारतीजवळ तडफडत होते.
या घटनेची माहिती समजताच हिंगोली शहर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, शहरचे पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नायब तहसीलदार माधव बोथीकर यांनी पोलीसांना या घटनेसंबंधीची माहिती दिली. तहसील कार्यालयात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडुन पंचनाम्याचे काम सुरु असतांनाच रंगनाथ मोडे हे शहर पोलीस ठाण्यामध्ये स्वत:हुन हजर झाल्याचे तसेच सिताराम राऊत यांचा खून केल्याची कबुली पोलीसांसमोर दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंदेल यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment