विद्यापीठ संकुलातील दहा विद्यार्थी सेट-नेट उत्तीर्ण

Tuesday, May 29, 2018
नांदेड/प्रतिनिधी - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गणितीयशास्त्रे संकुल मागील काही वर्षापासून सेट-नेट कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. कार्याशाळेमध्ये विद्यार्थ्यांना सेट-नेट अभ्यासक्रमाचे योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून करण्यात आल्यामुळे यावर्षी १० विद्यार्थी सेट आणि दोन विद्यार्थी नेट परीक्षा उतीर्ण झाले आहेत. मराठवाड्यामध्ये एकाच वेळी एका संकुलाचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात गणित विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे संकुलाचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे जानेवारी-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गणितीयशास्त्रे संकुलातील प्रसाद ढगे, वसंत कुकडे, वाजीद शेख, सचिन बसुदे, बालाजी उरेकर, पांडुरंग मोरे, संकेत मोहारे, सारंग बलशेटे, कृष्णा दिवटे हे गणित विषयात आणि अतिश तानगावडे हा विद्यार्थी संख्याशास्त्र विषयात पात्र ठरला आहे.
सीएसआयआर, नवी दिल्ली यांच्यातर्फे डिसेंबर-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेत प्रसाद ढगे हा गणित विषयात तर तुकाराम नवघरे हा संख्याशास्त्र विषयात उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे प्रसाद ढगे आणि वसंत कुकडे हे एम.एस्सी.द्वितीय वर्षात शिक्षण घेत असतांनाच उत्तीर्ण होऊन सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
या घवघवीत यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ.गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ.रमजान मुलानी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे, संकुलाचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर पवार, डॉ.बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ.गणेश फड, डॉ.रुपाली जैन, डॉ.अनिकेत मुळे, प्रा.नितीन दारकुंडे, डॉ.उषा सांगळे, प्रा.उदय दिव्यवीर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  

No comments:

Post a Comment