पोषण अभियान चळवळीसाठी लोकसहभाग मिळणे आवश्यक : विद्या ठाकूर

Saturday, September 29, 2018

मुंबई, दि. 28 : पोषण अभियानाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी अभियानास चळवळीचे रुप मिळणे आवश्यक असून यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी सांगितले.

राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत पोषण महिना म्हणून सप्टेंबर महिना साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आज सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंघल, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त इंद्रा मालो, उमेदच्या सचिव आर.विमला, राजमाता पोषण मिशनच्या संचालक सप्रभा अग्रवाल, विभागाच्या उपसचिव स्मिता निवतकर आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, पोषण अभियानाला चळवळीचे रुप मिळणे आवश्यक असून यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग देणे आवश्यक आहे. नव्या भारताच्या निर्माणासाठी कुपोषणाचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. पोषण्‍ महिना सांगता समारंभ एकदा करुन किंवा पोषण महिना साजरा करुन चालणार नाही, तर पोषण हे मिशन आहे. संपूर्ण देशात पोषण महिना साजरा करीत असताना याबाबतीतले सर्वांत जास्त कार्यक्रम महाराष्ट्रात घेतले गेले याचा आनंद वाटतो.

सचिव श्रीमती सिंघल यावेळी म्हणाल्या, १ ते ३० सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय पोषण महिना' उपक्रम राबविण्यात येत असताना मुलांच्या वाढीसाठी मुलांचे उत्तम पोषण होणे आवश्यक आहे हे राज्यभरात विविध कार्यक्रम हाती घेऊन सांगण्यात आले. बालकांमधील कुपोषण कमी करण्याबरोबरच किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करण्याच्या उद्देशाने पालकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम राज्यात राबविली गेली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रात या उपक्रमाला सर्वांचा सहभाग मिळाल्याचा आनंद आहे. 'सही पोषण, देश रोशन' असे घोषवाक्य या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आले असल्याचेही श्रीमती. सिंघल यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment