बीडच्या लेकरांसाठी ' पालक ' ना. पंकजाताई मुंडे धावल्या ; विषबाधित मुलांची केली आस्थेने चौकशी

Friday, September 28, 2018




पंकजाताईंना पाहताच रूग्णालयात मुलांच्या चेह-यांवर पसरला आनंद

बीड दि. २७ ----- वांगी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना कळताच राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयात जावून विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या मुलांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. ना. पंकजाताई दिसतांच उपचार घेत असलेल्या मुलांच्या चेह-यांवर क्षणभर आनंदाची छटा उमटली. दरम्यान, मुलांच्या आहाराच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दुपारी भोजनातून विषबाधा झाल्यानंतर सर्वांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा प्रकार समजताच पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे तातडीने मुंबईहून बीडकडे धाव घेतली. शहरात येताच त्यांनी थेट जिल्हा रूग्णालयात जावून उपचार घेत असलेल्या मुलांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईक पणे चौकशी केली. प्रत्येक मुलांच्या जवळ जात त्यांनी केलेल्या चौकशीमुळे मुलेही स्वतःच्या वेदना क्षणभर विसरले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात यांनी यावेळी त्यांना मुलांवर करण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती दिली. 


...तर कंत्राटदारांवरही कारवाई
विषबाधा प्रकरणाची ना. पंकजाताई मुंडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुलांना दिलेल्या आहाराचे नमुने अन्न व औषध प्रशासनाला पाठविण्यात आले आहेत, त्याचा अहवाल आल्यानंतर यात जे दोषी आढळतील त्यांचेवर तसेच दोषी आढळल्यास कंत्राटदारांवरही कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. मुलांच्या बाबतीत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्या म्हणाल्या. रूग्णालयात उपचार घेणा-या सर्व मुलांची तब्येत आता चांगली असून त्यांच्या पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही असे त्या म्हणाल्या. 

यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसिलदार अविनाश शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर खिरडकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर,रुग्णांचे नातवाईक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment